बीड | प्रतिनिधी : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणातील गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी त्यांना काल लातूर येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
भूसंपादन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणांनी सादर केलेल्या मुद्द्यांचा विचार करून न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
या सात दिवसांच्या कोठडीदरम्यान अविनाश पाठक यांच्याकडून महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भूसंपादन प्रक्रियेत कोणकोण सहभागी होते, निधी वाटपात अनियमितता झाली का, तसेच इतर संबंधित व्यवहारांची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.













