बीड | प्रतिनिधी : बीड जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत चकलांबा पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत गेवराई तालुक्यातील सुरळेगाव शिवारातील ऊसाच्या शेतामध्ये करण्यात आलेली गांजाची लागवड उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल 48 लाख 27 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे चकलांबा पोलिसांनी सुरळेगाव शिवारातील गट क्रमांक 113 मधील ऊसाच्या शेतावर छापा टाकला. कारवाईदरम्यान शेतामध्ये लावण्यात आलेली गांजाची 253 लहान-मोठी झाडे जप्त करण्यात आली. या झाडांचे एकूण वजन 184.4 किलो असून त्यांची अंदाजे किंमत 46 लाख 10 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय, 4 किलो 300 ग्रॅम सुका गांजा (किंमत अंदाजे 2 लाख 6 हजार 400 रुपये) तसेच 450 ग्रॅम निमसुका गांजा (किंमत अंदाजे 11 हजार 250 रुपये) असा एकूण 48 लाख 27 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मनोज ऊर्फ बादल भगवान आंधळे (वय 36), रा. नगद नारायण वस्ती, सुरळेगाव, ता. गेवराई याच्याविरुद्ध अंमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कन्हाडकर यांच्यासह चकलांबा पोलीस पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
दरम्यान, बीड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अमली पदार्थांची लागवड, साठवणूक, विक्री किंवा वाहतूक याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या 9270243200 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.













