बीड | प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला लाच स्वीकारताना अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बीडमध्ये पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे. जात पडताळणी प्रमाणपत्राच्या कामासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारताना समाजकल्याण विभागातील अधिलेखापाल राठोड अण्णासाहेब गबरू याला शुक्रवारी (दि. १०) एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भातील प्रलंबित काम करून देण्यासाठी आरोपी अधिलेखापालाने ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीडकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार आरोपी राठोड अण्णासाहेब गबरू याला तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.
दोन दिवसांत एसीबीची दुसरी मोठी कारवाई
बीड जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला लाच प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.













