बीड | प्रतिनिधी : आषाढी वारीचे भक्तिमय वातावरण राज्यभर रंगात आले असून, आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचे बीड जिल्ह्यात उत्साहात आगमन झाले आहे. परंपरेनुसार संत मुक्ताईंच्या पवित्र पादुकांना गोदावरी नदीत विधिवत स्नान घालण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत हरिनामाच्या गजरात पालखीचे स्वागत केले.
आज पालखीचा मुक्काम गेवराई येथे असून, शहरात वारकरी, दिंड्या आणि भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. टाळ-मृदंगाच्या निनादात, अभंग-भजनांच्या सुरावटीत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.
आषाढी एकादशी जवळ येत असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषासह विठुरायाच्या दर्शनाची ओढ प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यातही वारीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.













