बजरंग सोनवणेंच्या प्रचारार्थ शहरात कॉर्नर बैठका
बीड :- भाजपच्या भूलथापांची आणि बोगसगिरीची लोकांना प्रचंड चीड आली आहे. त्यामुळे आता सत्ताबदल अटळ आहे. आपल्याइथे सुद्धा लोकांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला म्हणजेच बजरंग सोनावणेंना आशीर्वाद देऊन दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं आहे. असे मत आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील कॉर्नर बैठकीदरम्यान बोलताना व्यक्त केले.
गुरुवारी (दि. २) रोजी बीड शहरातील शिवाजीनगर व इस्लामपूरा भागात इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आ. संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थित कॉर्नर बैठक झाल्या. यावेळी भाजपच्या हुकूमशाही वृत्तीने लोक त्रस्त झाले असून त्यांच्या बोगसगिरी आणि भुलथापांची लोकांना प्रचंड चीड आलेली आहे. सर्वसामान्यांना वेड्यात काढण्याचे काम या विचाराकडून झालेलं आहे. लोकांनी आता मनात पक्क ठरवलेलं असल्याने केंद्रात सत्ताबदल आणि बीड मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचे आ. संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. या बैठकांसाठी पक्षपदाधिकारी, कार्यकर्ते, संबंधित भागातील व शहरातील विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.