शिवाजीनगर पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील त्रिमूर्ती कॉलनी, दत्तनगर येथे अज्ञात चोरट्याने घराचे लॉक तोडून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिणे, दोन मोबाईलसह रोखरक्कम असा एकूण 2 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली. फिर्यादीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीड शहरातील त्रिमूर्ती कॉलनी येथे राहणारे श्रीमंत ईश्वरराव बिरादार वय 65 वर्षे, सेवानिवृत्त प्राध्यापक यांच्या घराचे लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे, दोन मोबाईल, रोखरक्कम असा एकूण 2 लाख 38 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. बिरादार यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.