बीड प्रतिनिधी : बीड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून डॉ.ज्योती रविंद्र घुंबरे (घोमरे) यांनी नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवारी सोमवारी (दि.१७) अर्ज दाखल केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्वच जागांवर आम्ही कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. नगरपरिषद निवडणुकीत ‘कमळ’ फुलणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ.ज्योती घुंबरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आदित्य सारडा, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री सलीम जहांगीर, शहराध्यक्ष अशोक लोढा, ज्येष्ठ नगरसेवक गणेश वाघमारे, डॉ.सारिका क्षीरसागर, इर्शाद शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने या निवडणुकीत एकूण ५२ उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे. विकासाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत बीड नगरपरिषदेत कमळ फुलविण्याची तयारी भाजपने पूर्ण केल्याचे चित्र आहे.
पुढे बोलताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्वच जागांवर आम्ही कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. बीड शहरात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्यासोबत घट्ट उभे आहेत आणि आम्ही लगेचच प्रचाराला सुरुवातही केली आहे. या नगरपरिषद निवडणुकीत कमळ फुलताना निश्चित दिसेल. बीडकरांच्या अपेक्षांना न्याय देणारे आणि भविष्यात त्रासदायक न ठरणारे उमेदवार भाजपने जाणीवपूर्वक उभे केले आहेत. गेली ३५ वर्षे बीडकरांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो आहोत. यावेळी हा विश्वास आणखी उत्स्फूर्तपणे वाढेल, असा मला विश्वास आहे.
उच्चशिक्षित उमेदवाराला भाजपने दिली संधी
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.ज्योती रविंद्र घुंबरे उच्चशिक्षित असून भूलतज्ञ आहेत. त्यांचे पती डॉ.रविंद्र हेही वैद्यकीय व्यवसायातच कान, नाक, घसा व कॅन्सर तज्ञ आहेत. तसेच, डॉक्टर असलेल्या सारिकाताई क्षीरसागर ह्या देखील वॉर्ड क्रमांक १५ मधून निवडणूक लढवत आहेत. यांसह इतरही उच्चशिक्षित व स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारांना भाजपने संधी दिली आहे.
डॉ.योगेश क्षीरसागरांच्या प्रवेशामुळे भाजपला ‘बूस्टर’
बीड शहरात गेल्या अनेक वर्षांत भाजपचा केवळ एकच नगरसेवक निवडून आला होता. मात्र अलीकडेच डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केलेल्या प्रवेशामुळे पक्षाला नवा बूस्टर डोस मिळाल्याचे राजकीय वातावरणात संकेत मिळत आहेत. डॉ.क्षीरसागर यांच्या आगमनामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे मानले जात असून निवडणुकीत या प्रभावाचा परिणाम दिसून येईल, अशी चर्चा शहरात रंगली आहे.
















