मराठाबहूल गावांनी दिला पंकजाताई मुंडेंना शब्द ; प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार
अंबाजोगाई : ताई, तुमचं नेतृत्व सर्वमान्य आहे, तुमच्याकडे विकासाचं एक व्हिजन आहे. तुम्ही अठरापगड जातींना सोबत घेऊन काम करता, त्यामुळे तुमच्यासारख्या नेतृत्वाची आज जिल्हयाला गरज आहे, तुम्हाला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेऊ अशा शब्दांत मराठाबहूल गावांनी भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्यासाठी आपला निर्धार व्यक्त केला. तथापि, माझ्या गॅरंटीवर विश्वास ठेवा, तुमच्या न्याय हक्कासाठी मी मागे हटणार नाही असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
पंकजाताई मुंडे यांनी शुक्रवारी घाटनांदूर, पट्टीवडगांव, जवळगाव, पुस, वाघाळा तसेच बर्दापूर सर्कलमधील गावांचा दौरा करून मतदारांच्या गाठीभेटी घेत थेट संवाद साधला त्यावेळी मतदारांनी त्यांच्या विजयाचा आपला निर्धार स्पष्टपणे बोलून दाखवला.
हा भाग माझ्या हक्काचा आहे. लोकनेते मुंडे साहेबांच्या राजकारणाची सुरवात इथूनच झाली, त्यांचेवर तुम्ही जीवापाड प्रेम केलं. त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व तुम्ही निर्माण केलं, त्यांच्या पश्चात माझ्या पाठिमागेही तुम्ही ताकद उभी केली. आज मी लोकसभेसाठी उभी आहे. मी उमेदवार म्हणून कशी आहे?मला कशामुळे मत देणार? असा सवाल त्यांनी केला. यावर उपस्थितांनी त्यांच्या जमेच्या बाजू सांगून विकास करण्याची धमक केवळ तुमच्यामध्ये आहे असे म्हटले, यावर त्या म्हणाल्या, मला मतं देण्याची दहा कारणं असतील पण द्यायच नाही यासाठी कोणतच कारण नाहीय. निवडणूकीत विरोधक माझेवर कोणतेही आरोप करतील. त्यांचेकडे दुसरे मुद्दे नाहीत. मुस्लिम, मराठा समाज बांधवांना ते बुध्दीभेद करून भिती घालतात, पण अशांना बळी पडू नका.मी जातीच नाही पण जिल्हयाच्या मातीचं नशीब नक्की बदलू शकते.
सन्मानजनक विजय हवा
–
मतदारसंघातील एकही गाव असे नाही, जिथे मी निधी दिला नाही. मला अजून खूप करायचयं. मुंडे साहेबांचं अधुरं स्वप्न पूर्ण करायच आहे. त्यासाठी आपल्याकडून मला सन्मानजनक विजय हवा आहे. ही संधी दवडू नका.नरेंद्र पुन्हा पंतप्रधान होणार आहेत.
माझ्या गॅरंटी वर विश्वास ठेवा. कोण न्याय देऊ शकतो? हे ओळखून मला आशीर्वाद द्या असं आवाहन पंकजाताईंनी यावेळी केलं.