उद्या राष्ट्रवादी पक्ष जिल्हा कार्यकारिणीची बैठक
बीड प्रतिनिधी : १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘स्वाभिमान’ सभेच्या अनुषंगाने पूर्व तयारी व जिल्हा कार्यकारिणीची बैठक उद्या (रविवार, दि.१३) रोजी बीड येथील राष्ट्रवादी भवन याठिकाणी आयोजित केली आहे. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर व प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांची बीडमध्ये, दि.17 ऑगस्ट रोजी ‘स्वाभिमान’ सभा होणार आहे. ही सभा ऐतिहासिक व यशस्वी करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर जिल्हाभर दौरे करून, बैठका घेऊन नियोजन करत आहेत. या सभेची तयारी जय्यत सुरू आहे. ही सभा राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्य कार्यकारिणीही तयारीला लागली आहे. रविवार (दि.13) रोजी बीड शहरातील राष्ट्रवादी भवन येथे दुपारी 4 वाजता, खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या ‘स्वाभिमान’ सभेच्या अनुषंगाने पूर्वतयारी बैठक व बीड जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहीत पवार तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहीत आर.आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बैठकीसाठी जिल्हा तथा राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. तरी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणीचे सदस्य, पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांनी या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केले आहे.