पालकमंत्री साहेब तुम्ही म्हणतात हा माझा पीए नाही मग धनराज मुंडे तुमच्या सोबत कसा?
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : मध्यंतरी जिल्हा परिषद मध्ये पालकमंत्री अतुल सावे यांचा फोन न घेतल्यामुळे पालकमंत्री अतुल सावे यांचे अघोषित पीए धनराज मुंडे यांनी गोंधळ घालत शिवीगाळ केले होते. यानंतर स्वतः जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये धनराज मुंडे यांच्या विरोधात तक्रार देत या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. यानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत हा माझा पीए नसल्याची कबुली दिली होती. आज पालकमंत्री पोलीस मुख्यालय या ठिकाणी आले असता जिल्हा परिषद मध्ये गोंधळ घालणारा धनराज मुंडे मात्र पालकमंत्र्यासोबत दिसल्याने अनेक चर्चा रंगल्या. पालकमंत्री साहेब तुम्हीच सांगा, तुम्ही म्हणता एक आणि करता एक असे कसे चालेल, जर तुम्ही म्हणत असाल की हा माझा पीए नाही तर मग हा कार्यकर्ता तुमच्यासोबत कसा याचे पालकमंत्र्यांनी उत्तर द्यावे.