पालकांनी या स्कूलमध्ये प्रवेश घेऊ नयेत — शिक्षण विभाग
प्रारंभ वृत्तसेवा
बीड शहरातील नारायणा इंग्लिश स्कूल गेल्या अनेक महिन्यापासून वादाच्या भवऱ्यात होते आज (ता. ०३) अखेर शिक्षण विभागाने या स्कूलला सील करत या स्कूलमध्ये पालकांनी प्रवेश घेऊ नये असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड शहरामध्ये मोठा गाजावाजा करत नारायणा इंग्लिश स्कूल यांनी मोठी पब्लिसिटी केली होती, यालाच अनेक पालक बळी पडले व त्यांनी नारायणा इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतला. लाखो रुपये फिस घेऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण या ठिकाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यात या स्कूलला मान्यताच नसल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून हे स्कूल वादाच्या भवऱ्यात होते. अखेर आज शिक्षण विभागाने या स्कूलला सील करत जोपर्यंत या स्कूलला मान्यता देण्यात येत नाही, तोपर्यंत या स्कूलमध्ये पालकांनी प्रवेश घेऊ नये असे आवाहन शिक्षणाधिकारी श्री कुलकर्णी यांनी केले आहे.