बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात पुढे तर महायुतीचे वर्चस्व
परळी वैद्यनाथ – आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे घवघवीत यश मिळवले आहे, ते यश जनता आमच्या पाठीशी असल्याचे सिद्ध करणारे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
बीड जिल्ह्यात या टप्प्यात 158 ग्रामपंचायतींची निवडणुक झाली, या निवडणुकीत 100 पेक्षा अधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) च्या ताब्यात आल्या असून, महायुतीचे जिल्ह्यात वर्चस्व आहे.
धनंजय मुंडे यांच्या परळी वैद्यनाथ मतदारसंघात धनंजय मुंडे यांचा करिश्मा पुन्हा सिद्ध होताना दिसत असून, एक-दोन संमिश्र अपवाद वगळता मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायती धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. या निकालानंतर धनंजय मुंडे यांनी सर्व लोकनियुक्त सरपंच, नवनियुक्त सदस्य तसेच पॅनल प्रमुख व सर्व प्रमुख नेत्यांचे अभिनंदन केले आहे.