बीड प्रतिनिधी : शहरातील अमृत अटल योजनेचे काम तत्काळ पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या मागणीची दखल घेण्यात आली असून शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या हॉलमध्ये कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी शहरातील पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मांडला. शहरवासियांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी शासनाकडे सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांनी ही समस्या धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून देताच अमृत अटल योजनेचे काम तत्काळ पूर्ण करावे, असे निर्देश श्री.मुंडे यांनी यंत्रणांना दिले आहेत. तसेच, लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहेत. यावेळी आ.प्रकाश सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी दीपा मुंडे-मुधोळ, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.