बीड प्रतिनिधी – शिवसेना नेते खा.संजय राऊत यांना शुक्रवारी भ्रमणध्वनीवर अज्ञात इसमाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त करणारी ही बाब आहे. धमक्याचे फोन सतत येत असताना हे सरकार फक्त टवाळकी करत आहे. खा.संजय राऊत यांच्या संरक्षणासाठी शिवसैनिक छातीचा कोट करतील. धमक्या देणार्याला तात्काळ जेरबंद करा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केली आहे.
प्रसिद्धी केलेल्या पत्रकात शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी म्हटले आहे की, शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत हे सरकारच्या चुकीच्या कारभाराविषयी सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत. विरोधी भूमिका मांडू नये यासाठी खा.संजय राऊत यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. शिवसैनिकांवर दबावाचा उपयोग होत नाही. हे लक्षात घेतले पाहिजे. खा.संजय राऊत यांना सातत्याने धमक्याचे फोन येत आहेत. याबाबत तक्रारीही देण्यात आल्या. मात्र भावनाशुन्य सरकार त्यांना पोलीस संरक्षण देत नाही. हे दुर्देव आहे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शिवसैनिक घेतील. सरकारने निदान धमक्या देणार्यावर कारवाई तरी केली पाहिजे अशी मागणी करत खा.संजय राऊत हे धमक्यांना भीक घालत नाहीत हे समजून घेतले पाहिजे. तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशाराही जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिला आहे.