विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील काम मुदतीपूर्वीच १०० टक्के पूर्ण
बीड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) बीडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते अभिनंदन प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. या प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे पाटील यांची उपस्थिती होती.
भारत निवडणूक आयोगाच्या १४ मे २०२६ च्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्यात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओमार्फत घरोघरी भेटी देऊन गणना अर्जांचे वितरण आणि संकलन करण्याचा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या नियुक्त यादी भागातील सर्व मतदारांना प्रत्यक्ष गणना अर्जांचे वितरण करून ते स्वीकारले. तसेच, आयोगाच्या ‘ECINET’ संगणक प्रणालीमध्ये बीएलओ ऍपद्वारे सर्व गणना अर्जांचे डिजिटल वितरण व स्वीकृतीची १०० टक्के प्रक्रिया अत्यंत जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने पूर्ण केली.
विशेष म्हणजे दि.२९ जुलै २०२६ पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेचे संपूर्ण कामकाज या अधिकाऱ्यांनी नियोजित मुदतीपूर्वीच म्हणजेच दि.१० जुलै २०२६रोजी यशस्वीरित्या पूर्ण केले. बीएलओंच्या या तत्परता, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेमुळे निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली असून त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच भविष्यातही याच समर्पित भावनेने काम करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सन्मानित करण्यात आलेले बीएलओ
1)श्री. मधुकर विश्वानाथ वाघ सहशिक्षक, प्राथमिक शाळा, बंदेवाडीता. केज, जि. बीड. ( यादी भाग क्र. 80, बंदेवाडी, 232-केज विधानसभा मतदारसंघ)
2)श्री. रामेश्वर भिमराव सुंबे, सहशिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, लोखंडवाडी ता. आष्टी, जि. बीड. (यादी भाग क्र. 88, लोखंडवाडी, 231-आष्टी विधानसभा मतदारसंघ)
3)श्री. रामेश्वर भिमराव सुंबे, सहशिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, लोखंडवाडी ता. आष्टी, जि. बीड.
( यादी भाग क्र. 88, लोखंडवाडी, 231-आष्टी विधानसभामतदारसंघ)
बीड जिल्ह्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आपले गणना अर्ज भरून घ्यावेत. नव्याने अद्ययावत होणाऱ्या मतदार यादीतील नोंदींच्या पडताळणीसाठी आपल्या भागातील बीएलओकडून अर्ज प्राप्त करून ते योग्यरित्या भरून द्यावेत, जेणेकरून हा कार्यक्रम विहित कालावधीत यशस्वी होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.













