अंकुश नगर येथील नागरिकाची ६९ हजार ७२० रुपयांची फसवणूक; संबंधितांवर कारवाईची मागणी
बीड : घरासाठी खरेदी केलेल्या फरशी बनावट निघाल्याने तब्बल ६९ हजार ७२० रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार अंकुश नगर येथील प्रतिक दोडके यांनी बीड ग्रामीण पोलिसांकडे केली आहे. संबंधित विक्रेत्याविरुद्ध कारवाई करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंकुश नगर, जुन्या चर्हाटा रोड परिसरातील रहिवासी प्रतिक दोडके यांनी आपल्या घरासाठी स्वास्तिक सिरामीक या दुकानातून फरशी खरेदी केली होती. फरशी बसविल्यानंतर ती निकृष्ट दर्जाची व बनावट असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी संबंधित विक्रेत्याकडे जाऊन तक्रार करत फरशी बदलून देण्याची मागणी केली.
मात्र, विक्रेत्याने उडवाउडवीची उत्तरे देत फरशी बदलण्यास नकार दिला. तसेच, “आम्हाला शहाणपणा शिकवू नका” अशा शब्दांत उद्धट वर्तन केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. फरशीमुळे झालेल्या नुकसानीची रक्कम ६९ हजार ७२० रुपये इतकी असून, ती परत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात १५ जानेवारी २०२६ रोजी बीड ग्रामीण पोलिस निरीक्षकांना लेखी निवेदन देण्यात आले असून, संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, वाढत्या बांधकाम साहित्याच्या व्यवहारात निकृष्ट व बनावट माल पुरविण्याच्या तक्रारी वाढत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
आम्ही दिलेला माल ब्रँडेड
यासंदर्भात संबंधित दुकानदाराशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की जो काही माल दुकानातून नेण्यात आलेला आहे तो सर्व माल ब्रँडेड असून असं काय असतं तर इतरही तक्रारी आल्या असते परंतु या संदर्भात अजून कसल्याही तक्रारी नसल्याचे मत संबंधित दुकानदारांनी व्यक्त केले आहे.













