युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार
बीड प्रतिनिधी : बीड शहरातील नगर भूमापन क्र.१७९९ या मालकीच्या जागेवर ‘सहकार संकुल’ इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे १४ कोटी ९८ लाख रुपये इतक्या खर्चाच्या प्रस्तावास शासनाकडून बुधवारी (दि.४) प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय व इतर सहकारी संस्थांच्या क्षेत्रीय कार्यालयांना आता एकाच छताखाली आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीडमध्ये सध्या जिल्हा उपनिबंधक कार्यालय हे जालना रोडवरील सहकार शक्ती इमारतीत भाडेतत्त्वावर कार्यरत आहे. यासाठी मोठा शासकीय निधी वार्षिक भाड्यापोटी खर्ची पडतो. हा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणि कार्यप्रणाली अधिक सुसुत्र करण्यासाठी सर्व सहकारी कार्यालये एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या सहकार संकुलामुळे शासकीय खर्च वाचणार असून नागरिकांसाठी एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, अनेक वर्षांपासूनचा सहकार संकुलाचा प्रश्न मार्गी लागला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.