शहरातील नागरिकांशी साधणार संवाद
परळी – रविवार दि. 17 रोजी सायंकाळी धनंजय मुंडे हे परळी शहरातील नांदेड टी हाऊस तसेच बरकत नगर या दोन ठिकाणी कॉर्नर सभांच्या माध्यमातून परळी शहरातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजता नांदेड ते हाऊस परिसर तर रात्री आठ वाजता बरकत नगर भागात धनंजय मुंडे यांच्या सर्वांचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील काही दिवसात प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात प्रचाराचा धडका लावला असून परळी मतदारसंघाच्या बाहेर बीड जिल्ह्यातील महायुतीचे अन्य उमेदवार तसेच राज्यातील माहितीच्या विविध उमेदवारांसाठी अनेक सभा घेतल्या आहेत.
रविवारी देखील धनंजय मुंडे हे अकोले येथे राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार किरण लहामटे यांच्या प्रचारासाठी जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी परळीत आल्यावर ते शहरातील नांदेड टी हाऊस परिसर तसेच बरकत नगर येथे आयोजित कॉर्नर सभांना संबोधित करतील.
धनंजय मुंडे यांनी मागील पाच वर्षाच्या काळात केलेली विकास कामे, पुढे करावयाची विकास कामे त्याचबरोबर इथल्या प्रत्येक कुटुंबाशी असलेला त्यांचा थेट कनेक्ट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या मुंडे बहीण भाऊ हे दोघे एकत्र असल्यामुळे धनंजय मुंडे यांची बाजू भक्कम मानली जात आहे.
परळी शहरातील मुस्लिम बहुल भाग असलेल्या नांदेड ते हाऊस परिसर व बरकत नगर या दोन भागातील सभांमुळे मोठ्या प्रमाणात धनंजय मुंडे यांच्या परळी शहरातील मताधिक्यात वाढ होणार असल्याचेही मानले जात आहे.