प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : तालुक्यातील वासनवाडी परिसरात राहणार्या 17 पारधी समाजातील कुटुंब घराच्या न्यायासाठी लढत होते. याच लढ्यामध्ये पाच-सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणा दरम्यान याच कुटुंबातील एकाचा मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने या कुटुंबाला न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले होते. अखेर आज सीईओ अजित पवार यांनी पारधी समाजातील 17 कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी एक एक्कर जागा या कुटुंबीयाला उपलब्ध करून दिली. यावेळी अजित पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, आदित्य जीवने तहसीलदार बीड, सुहास हजारे, अनिरुद्ध सानप गटविकास अधिकारी बीड, सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांची उपस्थिती होती. या दरम्यान त्या सर्व कुटुंबीयांच्या उपस्थितीत सातबाराचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गावचे सरपंच, ग्रामसेवक, व नागरिक उपस्थित होते.