भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या बीड नगरपरिषद प्रशासनाला सूचना
वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी दोन्ही चौकात यंत्रणेसोबत पाहणी
बीड प्रतिनिधी : शहरातील अत्यंत वर्दळीचे अंबिका चौक आणि राजीव गांधी चौक येथील वाहतूक कोंडी कमी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी निर्माण झालेले सर्व प्रकारचे अडथळे तात्काळ हटविण्याच्या सूचना भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बीड नगरपरिषद प्रशासनाला दिल्या. यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकारी शैलेश फडसे आणि संबंधित यंत्रणेसोबत सोमवारी (दि.१६) दोन्ही चौकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
अंबिका चौकातील सुशोभीकरणामुळे वारंवार निर्माण होणारा वाहतुकीचा अडथळा दूर करण्याबरोबरच परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे. तसेच, राजीव गांधी चौकातील मध्य रस्त्यात उभा असलेला विजेचा खांब तातडीने हलविण्याची मागणीही करण्यात आली. अंबिका चौकातील रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) अन्यत्र हलविण्याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली. ही कामे लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी महावितरण कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करावा, अशा सूचना डॉ.क्षीरसागर यांनी दिल्या. यावेळी मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी दोन्ही चौकातील समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन देत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वाहतुकीची सुलभता वाढविण्यासाठी प्रशासनाने त्वरीत उपाययोजना कराव्यात, असेही डॉ.क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी स्थानिक नागरिकांसह भाजपचे युवा नेते नागेश तांबारे, नगरसेवक मंगेश धोंगडे, सरपंच अमोल बागलाने, राजू महुवाले, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
वाहतूक पोलिसांच्या नेमणुकीसाठी पोलीस अधीक्षकांना भेटणार
अंबिका चौक, राजीव गांधी चौक या वर्दळीच्या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याबाबत पोलीस अधीक्षकांना भेटून चर्चा करणार असल्याचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले.
















