दोन दिवसात नव्या जिल्हाप्रमुखाची घोषणा
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : अवैध गुटखाप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर नव्या जिल्हाप्रमुखाची लवकरच निवड होणार असून या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील इच्छुक पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून आहेत. नूतन बीड जिल्हा शिवसेनाप्रमुखपदी किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांना सर्व स्तरातून पसंती मिळत असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे. यासह जिल्हाप्रमुखाच्या या रेसमध्ये माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे, शिवसेनेचे नेते गणेश वरेकर यांचीही नावे पुढे आहेत. ही निवड गुरुवारी होणार आहे
बीड जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा प्रकरणी पाच दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर दोन दिवसांनी मुंबई येथून त्यांच्या पदाला स्थगिती देत लवकरच नव्या जिल्हाप्रमुखाची निवड होईल अशी माहिती मिळाल्यानंतर या जिल्हाप्रमुख पदासाठी खरोखरच रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसत आहे. बीड जिल्हाप्रमुख पदासाठी बीड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मुंबईत सध्या तळ ठोकून आहेत. यात किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे, शिवसेनेचे नेते गणेश वरेकर, युवा नेते नितीन धांडे यांच्यासह इतर पदाधिकारी मुंबईत दाखल झाले असून प्रत्येकजण या पदासाठी आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहेत. या पदासाठी लवकरच एकाची नियुक्ती करण्यात येणार असून गुरुवारी नव्या जिल्हाप्रमुखाची घोषणा होण्याची शक्यताही आहे.