श्री क्षेत्र रामगडावर १० एकर मध्ये फुलणार सह्याद्री देवाराई, सयाजी शिंदे यांच्या हस्ते ७५ झाडे लावून वृक्ष लागवडीला सुरूवात
प्रतिनिधी | बीड
जगाला आपल्याकडून काही देता आलं तर ते वृक्ष लागवडीतून देता येईल. सध्या जगाला हिरव्या मशालींची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकानी आपल्या आई-वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाढदिवसा येवढे झाडे लावली पाहिजेत. असे आवाहन सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. बीड तालुक्यातील श्री क्षेत्र रामगड येथे १० एकर मध्ये फुलणाऱ्या सह्याद्री देवराई प्रकल्पाची सुरूवात त्यांच्या हस्ते ७५ झाडे लावून करण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
शहरातील हॉटेल ऑलिव्ह येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सिने अभिनेते सयाजी शिंदे बोलत होते. यावेळी लेखक अरविंद जगताप, सह्याद्री देवराई समन्वयक शिवराम घोडके यांची उपस्थिती होती.
शहरापासून पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या पालवनच्या डोंगरावर २०१६-१७ मध्ये सिने अभिनेते सयाजी शिंदे, अरविंद जगताप, शिवराम घोडके यांनी वन विभागाच्या २५० एकरमध्ये १ लाख ६४ हजार विविध जातीचे वृक्ष लावून ३ एकर मध्ये ३ घन वन तयार केलेले आहे. त्याच धर्तिवर बीड पासून ७ किलो मीटर अंतरावर असलेल्या रामगडावर १० एकर मध्ये देवराई २ होणार आहे. येथे विविध सुगंधी, पक्षी बसणारे, औषधी, फळ, सावली देणारे १० हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत. तर ४० गुंठ्यामध्ये २ घन वन प्रकल्पाचे काम १५ रोजी मे पासून सुरू झाले आहे. आतापर्यंत येथे ५ हजार खड्डे जेसीबीच्या सहायाने खोदण्यात आले आहे. या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेवून माध्यमांशी संवाद साधला. श्री क्षेत्र रामगड येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साळवे, डॉ. प्रदीप शेळके, सुहास वायंगणकर, सागर साठे,माजी सरपंच कोंडीराम निकम, शरद निकम हे उपस्थिती होते.
—–
लेखक अरविंद जगताप यांच्या वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ झाडांची लागवड
—-
श्री क्षेत्र रामगड येथे होणाऱ्या देवराई प्रकल्पाची सुरूवात लेखक अरविंद जगताप यांच्या वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त येथे वेगवेगळ्या जातीचे ७५ झाडे लावून सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. प्रत्येकानी आपल्या आई-वडिलांच्या वाढदिवसानिमित्त असा उपक्रम राबवावा असे आवाहन सयाजी शिंदे यांनी यावेळी केले.
——
अगोदर डोक्यात झाड लावा, नंतर जमिनित- शिवराम घोडके
वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकानी अगोदर डोक्यात झाड लावलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या डोक्यात झाड लावून जगवण्याची संकल्पना उतरणार नाही. तोपर्यंत जमिनीत झाडे लागणार नाहीत. त्यामुळे अगोदर आपल्या डोक्यात झाडे लावा. वृक्ष लागवड ही सह्याद्री देवराई, वनविभाग, रामगड आणि भक्तांच्या सहकार्यातून होत आहे. सह्याद्री देवराईचे काम पूर्ण झाल्यानंतर आलेल्या प्रत्येक भाविकाला प्रसाद म्हणून रामगडावर झाड दिले जाणार आहे. भाविकांनी ते झाड आपल्या शेतात लावावे.
-शिवराम घोडके, जिल्हा समन्वयक, सह्याद्री देवराई
—–
सिता वन, राम वन, पंचवटी होणार
येथे विविध जातीचे वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यामध्ये वेगवेगळे वृक्ष असणार आहेत. गडाजवळ कमी उंचीचे त्यापुढे मोठ-मोठे असे वृक्ष लागवड होणार आहे. विशेष म्हणजे येथे सिता वन, राम वन अणि पंचवटी वन तयार करण्यात येणार आहे.
—
एका झाडामध्ये १५ फुटाचे अंतर मध्ये २० फुटाचा असणार रस्ता
१० एकर मध्ये झाडे लावताना त्याचा अभियंत्यामार्फत पूर्ण प्लॅन तयार करून घेण्यात आला आहे. येथे विविध कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांना सहज झाडाच्या सावलीला बसता येईल झाडाखाली वाहन पार्क करता येईल. वाहन पार्किंगच्या ठिकाणी दोन्ही झाडांच्या मध्ये २५ फुटांचे अंतर ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक झाडामध्ये १५ फुटाचे अंतर असणार असून मध्ये २० फुटाचे रस्ते बनवण्यात येणार आहेत.