बीड : लोकसभेच्या निवडणूकीत मते मागत असताना कुणावर ही टीका – टिप्पणी करणार नाही. मात्र आमच्यावर जे कुणी टीका टिप्पणी करतील. त्यांना जशाच तसे प्रतिउत्तर व्याजासाहित दिले जाईल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. तर भाजप उमेदवार आणि महायुतीच्या नेत्यांना अडवून घोषणाबाजी करून गावात येवू दिले जात नाही. हे त्यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामाचे फलित असून त्यांचे हे दुर्दैव असल्याची कोपरखळी देखील त्यांनी मारली.
बीड येथे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया विकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी व्यक्तिगत पातळीवर कोणावरही टीका करणार नाही. मात्र माझ्यावर टीका टिप्पणी होत असेल तर मी गप्प बसणार नसून त्याची परतफेड जरूर केली जाईल. ती सुध्दा व्याजासहित करू. जिल्ह्यामध्ये जागोजागी भाजपच्या उमेदवार व कार्यकर्त्यांना लोकांनी आतापर्यंत प्रश्न विचारून त्यांच्या गाड्या अडवून घोषणाबाजी करीत आहेत. हे भाजपच्या माजी पालकमंत्री उमेदवार, मावळत्या खासदार आणि विद्यमान पालकमंत्र्यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामाचे फलित असू शकते अशी मिश्किल कोपरखळी बजरंग सोनवणे यांनी मारली. आम्ही निवडणूक जातीवर नव्हे तर विकास कामावर व पुढे काय कराल, या पुढचं व्हिजन काय असेल याच्यावर लढवत आहोत. मात्र केवळ निवडणुकीसाठी भाजप आणि त्यांचे कार्यकर्ते जातीवादपणा करीत आहेत. आतापर्यंत आम्हाला २५ वर्ष कुणबी जातीच्या प्रमाणपत्रापासून वंचित ठेवले आहे. ही निवडणूक ओबीसी आणि मराठा अशी होत नसून एकाच प्रवर्गात होत आहे. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी पालकमंत्री व उमेदवार हे अशा प्रकारचे जातीवाद करीत आहेत.
पालकमंत्री हे सरपंचांना धमकी देत असल्याचे वक्तव्य करीत आहेत. निधीसाठी सरकारच्या दारात येऊ नका अशा प्रकारचे वक्तव्य करीत आहेत. परंतु सरपंचपद संविधानिक पद असून स्व. राजीव गांधी यांनी पंचायत राजच्या माध्यमातून सरपंचांना गावच्या विकासासाठी दिलेला निधी हा त्यांचा अधिकार आहे. त्याला कुणाच्या शिफारशीची गरज नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले. राजकीय जीवनात प्रारब्ध ठरण्याचा अधिकार हा जनतेचा आहे. मात्र जनतेचे प्रारब्ध ठरविणारे तुम्ही कोण ? असा खणखणीत सवाल पालकमंत्री व भाजप उमेदवाराला त्यांनी केला. निवडणूक लढवीत असताना भावनिक नव्हे तर मतदारसंघ संघासाठी जर तुमचे व्हिजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना भावनिक करून किती दिवस निवडणुका लढविणार ? असाही सवाल केला. सत्तेत असताना केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा देण्याची जबाबदारी माझी नव्हे तर सत्ताधाऱ्यांची आहे. लोकप्रतिनिधीनी त्यांनी केलेला विकास लोकांना सांगितला पाहिजे. अशी पुष्टी जोडली. जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्ते, पाणी पुरवठ्याची जलजिवन विकास विकास योजना, वीज या मूलभूत कामाचा आढावा मंत्री आणि खासदार यांनी घ्यायला हवा. परंतु त्यांना यासाठी वेळ नाही असेही ते म्हणाले. अद्यापही जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न सुटलेला नाही. तसेच पीकविमा, अनुदान याबाबत प्रश्न जर सत्ताधारीकडून सुटत नसेल तर हे पाप कोणाचे ? असा जळजळीत प्रश्न त्यांनी विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था चांगल्या चालवल्या. परंतु भाजपच्या ताब्यात गेलेल्या डीसीसी बँकेचे काय झाले ? यात अनेक भाजपच्या नेत्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका दोन-दोन वर्ष होत नाहीत. हे सुद्धा भाजपचे अपयशच आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कांदा, कापूस, सोयाबीन या पिकांना भाव मिळत नाही. शेतमालाच्या आधारभूत किमती ठरविण्याचा केंद्र सरकारचा अधिकार आहे. त्यासाठी या खासदारांचे योगदान काय ? तुमच्या या पदाचा जिल्हावासियांना काय फायदा ? असा प्रश्न उपस्थित केला. तर स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्वप्न साकार करायचे आहे. असे पालकमंत्री सांगतात. मग स्व. मुंडे साहेबावर अत्यंत खालच्या पातळीत टीका करून त्यांना कोणी रडविले ? असा ही प्रतिप्रश्न केला तुमच्या सोबत निवडणुकीत कोण आहे ? या प्रश्नाचे उत्तर देताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की, जे दिवसा माझ्यासोबत आहेत, ते रात्री सुद्धा माझ्या सोबत आहेत. मात्र दिवसा भाजप सोबत असलेले रात्री कुणासोबत आहेत हे मला सांगता येत नाही असे म्हणून खळबळ उडवून दिली आहे. सत्ता असताना सत्तेचा वापर करून केलेली विकास कामे या मुद्यावर निवडून लढवायला हवी. मात्र केवळ भावनेवर लोकांना भावनिक करून निवडणूक जिंकता येत नसते. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यास ते निवडून येणारच अशी असा दृढ आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या प्रा. सुशिलाताई मोराळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर व परमेश्वर सातपुते हे उपस्थित होते.