जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचार्यांचा मोर्चा धडकला
पेन्शन आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे
महिला कर्मचार्यांची लक्षणिय उपस्थितीत
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राज्यातील १८ लाख कर्मचारी गेल्या दोन दिवसापासून बेमुदत संपावर गेले असून जो पर्यंत जुनी पेन्शन लागु होत नाही तो पर्यंत संप मागे घेणार नाहीत याभुमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. आज (ता. १६) बीड मध्ये कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. यात महिला कर्मचार्यांची संख्या सुद्धा मोठी होती. यावेळी कर्मचार्यानी प्रचंड घोषणाबाजी करत सर्वांचे लक्ष वेधले होतै. पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, पेन्शन मिळालीच पाहिजे यासह इतर घोषणांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले होते. जो पर्यंत पेन्शन लागु होत नाही तो पर्यंत संप कायम राहणार अशी भुमिका कर्मचार्यांनी घेतली आहे.
जुन्या पेन्शनसाठी राज्यातील कर्मचार्यांनी संप पुकारला असून यात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात बीड जिल्ह्यातील १५ ते २० हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. गेल्या तीन दिवसापासून कर्मचारी संपावर ठाम आहेत. कर्मचार्यांनी संप सुरु केल्यामुळे माञ अनेक विभागात सर्व सामान्यांची कामे खोळंबली आहेत. आज कर्मचार्यांच्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यात जिल्ह्यातील विविध विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. महिलांची संख्या सुद्धा यावेळी मोठी होती. यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली होती. यावेळी कर्मचार्यांनी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत सरकारला दिले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात विविध फलक घेत शासनाचा निषेध केला. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे मात्र सर्वसामान्यांचे कामे रेंगाळे आहेत तर दुसरीकडे राज्य शासन जुनी पेन्शन योजना लागू करण्यास असमर्थता दाखवत असल्यामुळे नेमका हा तोडगा कधी निघणार हा सुद्धा प्रश्न आहे. आंदोलन करते व राज्य सरकारमध्ये लवकर तोडगा निघावा व सर्वसामान्यांची व विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान थांबावं व सरकारने यात सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे.