हिंदू-मुस्लिम बांधवांशी साधला संवाद
बीड: अर्धमसला (ता.गेवराई ) येथील मस्जिदमधे दि.३० मार्च रोजी पहाटे जिलेटीनचा स्फोट झाला. यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने दोन आरोपीना ताब्यात घेतले. दरम्यान, खा.बजरंग सोनवणे यांनी अर्धमसला येथे भेट देत मस्जिदची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले.
अर्धमसला गावात ईदच्या आदल्या दिवशी दोघांनी मिळून पवित्र मस्जिदमधे जिलेटिन कांड्याचा स्फोट केला. स्फोटात मस्जिदला तडे गेले आहेत. दरम्यान, ही घटना समजताच खा.बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील नियोजित कार्यक्रम बाजूला सारून अर्धमसला गावात जाऊन मस्जिदची पाहणी करून हिंदू-मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. यावेळी गावातील लोक प्रचंड समजदार आहेत, याठिकाणी दोन्ही धर्मातील लोकांमधे एकमेकांच्या मनात प्रचंड आदर दिसत आहे. जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आपण पोलिस अधीक्षक यांना बोलनार आहोत. हिंदू-मुस्लिम बांधवांचे मोठे सण साजरे केले जात आहेत. हा उत्सव आनंदात साजरा करावा आणि सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन केले. यावेळी मुस्लिम बांधवानी देखील गावात आम्ही कायम एकीने राहत आलो आहोत, आजही आणि उद्याही एकीने राहू, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी आमदार बदामराव पंडित, दत्तात्रय ठोंबरे, निझाम शेख, बाबुराव पोटभरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याशी गावात चर्चा करून या स्फोटामागे काय उद्देश होता हे तपासा, अश्या सूचना केल्या.
‘त्याच’ मस्जिदमधे खा.सोनवनेंचा इफ्तार
अर्धमसला गावात ज्या मस्जिदमधे स्फोट झाला, त्याच ठिकाणी खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत हिंदू-मुस्लिम बांधवानी एकत्रीत येत इफ्तार केला. यावेळी माजी आमदार बदामराव पंडित, निजाम शेख, भागवत तावरे यांची उपस्थिती होती.

















