विठूरायाच्या नामस्मरणाने व नगदनारायण महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला नारायणगड परिसर
Beed : महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नारायण गड येथे आषाढी एकादशी निमीत्त रविवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच पंचक्रोशीतील विविध गावांमधून वारकरी भाविक आषाढी वारी निमित्त विठूनामाचा जयघोष करत टाळ- मृृंगाच्या गजरात दिंडीच्या माध्यमातून पायी चालून गडावर दाखल झाले होते. तर जिह्यासह विविध भागातून श्रीक्षेत्र नारायणगड येथे भाविकांची आषाढी एकादशी निमीत्त मांदीयाळी होती.यावेळी गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते पहाटे महापूजासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दरम्यान विठूरायाच्या नामस्मरणाने व नगदनारायण महाराजांच्या जयघोषाने गडाचा परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
मराठवाडा ही साधु संतांची भुमी आहे याच मराठवाड्यामध्ये अनेक साधु संत जन्माला आले आणि आपले जिवन भागवत धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य भगवंत सेवेसाठी समर्पित केलेले आहे. याच मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सोळाव्या शतकात स्वानंद सुखनिवासी सचिदानंद स्वरूप संत महात्मा नारायण महाराज यांनी स्थापन केलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडानी महाराष्ट्राची धाकटी पंढरी अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आषाढीवारी निमीत्त जे भाविक भक्त श्रीक्षेत्र पंढरपुर ला जाऊ शकत नाहीत ते धाकटी पंढरी म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नारायणगड येथे येऊन विठ्ठल रुक्मिनी व नगदनारायण महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतात. आषाढी एकादशी निमीत्त श्रीक्षेत्र नारायण गड येथे नित्यनेमाप्रमाणे पहाटे संस्थनाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते विठ्ठलाची व नगद नारायण महाराज यांची महापुजा करण्यात आली. तसेच मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच आलेल्या भाविकांना संस्थानच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थानचे स्वयंसेवक तसेच बीड पोलिस स्टेशन, शिरूर पोलिस स्टेशन यांच्या वतिने पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. शिरुर व बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस तसेच होमगार्ड मंदिर परिसरात विविध ठिकाणी बंदोबस्तात तळ ठोकून होते.