बीड जिल्ह्यातील श्री. मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान
पंढरपुर : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी मानाचे वारकरी मु.पो. रुई, ता.गेवराई, जि.बीड येथील मुरली भगवान नवले (५२) आणि सौ. जिजाबाई मुरली नवले (४७) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, यांच्यासह समितीचे अन्य सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यासमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले.
*वारकरी सन्मान व एसटी मोफत पास वितरण*
आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते.
मानाचा वारकरी बीड जिल्ह्यातील..
आषाढी यात्रा 2022
मानाचा वारकरी
नाव :- श्री मुरली भगवान नवले, वय 52.
सौ जिजाबाई मुरली नवले, वय 47
रा. रूई, ता गेवराई जि बीड
व्यवसाय :- शेती
वारी :- 20 वर्षे,
यावर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत पायी आले आहेत.