राज्यात व देशात सत्ता असून सुद्धा जिल्हा ठेवला विकासापासुन दुर
अहमदनगर,बीड,परळी रेल्वे कधी सुरु होणार?
स्वतःच्या स्वार्थासाठी जिल्ह्यात पंकजा मुंडे तळ ठोकून
ज्यावेळेस बीड जिल्ह्याला गरज होती, त्यावेळेस मात्र मुंबई सोडली नाही!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, याच जिल्ह्यामध्ये प्रचंड बेरोजगारीची समस्या निर्माण झालेली आहे, त्यात जिल्ह्यामध्ये एकही मोठा उद्योग नाही. यामुळे येथील बेरोजगार युवक रोजगाराच्या शोधासाठी मोठ्या शहरात स्थलांतरित होत आहे. यासह इतरही महत्त्वाचे प्रश्न बीड जिल्ह्यात प्रलंबित आहेत. 2019 मध्ये पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये पराभव झाल्यानंतर तब्बल पाच वर्ष पंकजा मुंडे यांनी आपल्या सोयीनुसार बीडला येणे पसंद केले. बीडमध्ये न थांबता मुंबईला त्या जास्त राहत होत्या. यामुळे पंकजा मुंडे यांच्यावर जिल्ह्यामध्ये प्रचंड नाराजगी आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू असून पंकजा मुंडे यांना भाजप कडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात राहणं अधिक पसंत केलं परंतु फक्त निवडणुकांमध्ये चेहरा दाखवणाऱ्यांना बीडची जनता मात्र यावेळेस स्वीकारणार नसल्याचे सध्यातरी दिसत आहे. विशेष म्हणजे आज पंकजा मुंडे यांनी बोलताना सांगितलं की पाच वर्षे मला द्या मग मी बघा काय करते, आता सांगा यापूर्वीची सत्ता कोणाकडे होती, त्यावेळेस काय दिवे लावले ते आता तुम्ही लावणार आहात असेही बोलले जात आहे.
बीड जिल्ह्याला हक्काचा खासदार हवा आहे. प्रत्येक वेळी निवडणुकांमध्ये दिलेली आश्वासन फक्त निवडणुकीपुरतीच ठरतात. एकदा का निवडणुका झाल्या की परत तो उमेदवार चेहरा दाखवत नाही. अशी अनेक उदाहरणे बीड जिल्ह्याने अनेक वेळा पाहिलेली आहेत. संविधानाने दिलेला निवडणुकीचा अधिकार मात्र यावेळेस मतदार योग्य पद्धतीने वापरण्यासाठी तयार झाले आहेत. यावेळेस कोणत्याही नेत्याच्या भुलथापाला बळी न पडता आपल्या कामाचा, आपले प्रलंबित प्रश्न मांडणारा, आपल्या भागातील विकासावर बोलणारा उमेदवार मात्र यावेळेस बीडकरांना हवा आहे. सध्या लोकसभा 2024 चे वारे वाहु लागले असून 13 मे रोजी बीड मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. याच अनुषंगाने प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत आहे. परंतु भाजपच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा 2019 मध्ये पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्याला वाऱ्यावर सोडलं होतं परंतु त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर त्या बीड जिल्ह्यामध्ये परत सक्रिय झाल्या, विशेष म्हणजे तुमच्या स्वार्थासाठी ज्यावेळेस तुम्ही जिल्ह्यात तळ ठोकून असता व ज्यावेळेस बीड जिल्ह्याला तुमची गरज असते, त्यावेळेस तुम्ही मुंबईत असता या सर्व बाबी आता मतदारांनी लक्षात ठेवले आहेत. यामुळे ही निवडणूक पंकजा मुंडे साठी दिसते तेवढी सोपी नक्कीच नाही. सध्या पंकजा मुंडे यांच्याकडे जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचा फौजफाटा असला तरी जनता मात्र यावेळेस योग्य उमेदवार निवडून देईल अशी चर्चा बीड मतदार संघात आहे.