बीड प्रतिनिधी: महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री.क्षेत्र नगद नारायण गड येथे दरवर्षीप्रमाणे दि.८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात्रामहोत्सवात बीड जिल्ह्यासह परजिल्ह्यातून भाविक भक्त येणार असल्याने गडाच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तगडे नियोजन केले असल्याची माहिती ह.भ.प.महंत मठाधिपती शिवाजी महाराज यांनी दिली आहे.
धाकटी पंढरी श्री.क्षेत्र नगद नारायण गड येथे कार्तिकी एकादशीनिमीत्त आठ दिवस यात्रेचे आयोजन केले जाते. या आठ दिवसात जिल्ह्याभरातील लाखो भाविक दर्शनासाठी गडावर येत असतात.दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आजपासून यात्रामहोत्सवास सुरूवात होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून यात्रेची तयारी सुरू असून गडावर येणाऱ्या लहान-थोरांचा आनंद द्विगुणीत व्हावा, यासाठी रहाटपाळणे, लहान मुलांसाठी विविध खेळण्याही आलेल्या आहेत. या यात्रेला अनेक वर्षांची परपंरा असून आठ दिवस याठिकाणी विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. शिवाय, किर्तन, भजन, हरिपाठ असे कार्यक्रम नियमीत प्रमाणे पार पडणार आहेत. भाविकांसाठी याठिकाणी अनेक अन्नदाते आपआपल्या परिने अन्नदानाचे कामही करत असतात. बुधवारी पहाटे पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. आठ दिवस विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याचेही ह.भ.प.महंत मठाधिपती शिवाजी महाराज यांनी म्हटले आहे.
०००
रक्तदान शिबीराचे आयोजन: गवते
कार्तिकी एकादशी आणि यात्रामहोत्सवानिमीत्त नारायणगड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन दि.९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आलेले आहे.रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, यासाठी विविध गावात दवंडी देण्यात येत आहे. परिसरातील तरूण मंडळींनी रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुण्य पदरात पाडून घ्यावे, असे अवाहन गडाचे विश्वस्त बळीराम गवते यांनी केले आहे.