–चक्क दारु माफियाने पोलीस ठाण्यात जाऊन साजरा केला होता पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस
–पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची नियंत्रण कक्षात बदली
-पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांचे निलंबन
-या प्रकाराची संपुर्ण चौकशी करण्यात येणार; पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके करणार चौकशी
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : येथील पेठ बीड पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस चक्क एका दारु माफियांने ठाण्यात जाऊन साजरा केल्यानंतर येथील पोलीसांचे व अवैद्य माफियांचे संबंध किती जवळचे आहेत हे लक्षात आले. यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या गंभीर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांचे निलंबन केले तर पोलीस निरीक्षक केदार पालवे यांना नियंत्रण कक्षात हलवले. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे पोलीस विभागात एक चांगला वचक बसणार, यात मात्र शंका नाही.
गेल्या काही वर्षापासून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारुचा व्यवसाय करणारा सराईत गुन्हेगार रोहित राजू चव्हाण (वय 24, रा. नवनाथनगर, एमआयडीसी बीड) यांच्यावर विविध गुन्हे नोंद आहेत. चव्हाणने 16 सप्टेंबरला पेठ बीड पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांचा वाढदिवस साजरा केला होता. या प्रकरणावरुन येथील पोलीसांचे व आरोपींचे संबंध किती जवळचे आहेत हे लक्षात आले. याच प्रकरणाची दखल घेऊन पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी येथील पोलीस निरीक्षक यांची नियंत्रण कक्षात बदली केली तर ज्यांचा वाढदिवस साजरा केला होता ते पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांंचे निलंबन केले आहे. तसेच या प्रकरणाची संपुर्ण चौकशी करण्यासाठी पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांच्याकडे पुढील तपास देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या कारवाईमुळे भविष्यात अशा घटना होणार नाही.