आ.विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश
गेवराई प्रतिनिधी ः- विधानसभा निवडणुकी दरम्यान सिंदफणा नदीवरील टाकळगाव कोल्हापूरी पध्दतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याचे काम करू असा शब्द जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दिला होता. त्यांनी दिलेला शब्द खरा करून दाखविला आहे. मागील अनेक वर्षांपासून अमरसिंह पंडित आणि आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विजयसिंह पंडित यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्रीमंडळ बैठकीत टाकळगाव बॅरेजच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सिंदफणा काठावरील सिंचन क्षेत्रात भरीव वाढ होणार असल्याची माहिती आ.विजयसिंह पंडित यांनी देवून महायुती सरकारचे त्यांनी आभार व्यक्त केले.
गेवराई सारख्या सततच्या दुष्काळग्रस्त तालुक्यात सिंचन सुविधा वाढाव्यात यासाठी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी संधी मिळेल तेथे प्रयत्न केले. गोदावरी प्रमाणे सिंदफणा नदीपात्रात सुध्दा बारमाही पाणी असावे यासाठी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. विधानसभा निवडणुकीत टाकळगाव को.प. बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याचे आश्वासन आ.विजयसिंह पंडित यांच्या जाहिरनाम्यात देण्यात आले होते. आ.विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नांमुळे याकामी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच बैठक घेऊन या कामास मंजुरी दिली होती. मंगळवार, दि.१ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत टाकळगाव बॅरेजच्या कामास १९.६६ कोटी रुपये अंदाजित किंमतीसाठी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
टाकळगाव बॅरेजमुळे परिसरातील २९० एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. टाकळगाव, हिरापूर, पिंपळगाव कानडा, औरंगपूर कुक्कडा, कोपरा, दगडगाव, पारगाव जप्ती, हिंगणी हवेली, नांदुर हवेली यांसह परिसरातील गावांच्या सिंचनासाठी या बॅरेजचा फायदा होणार आहे. बीड आणि गेवराई तालुक्यातील सिंदफणा नदीकाठच्या गावांनाही त्याचा लाभ होईल. मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानंतर गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले. टाकळगाव व परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून आ.विजयसिंह पंडित व अमरसिंह पंडित यांचे आभार मानले.