राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते यांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
बीड: मागील चार दिवसांपुर्वी बीड मतदारसंघातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून यात शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहेच परंतु नदी काठी असलेली शेतीही खरडून गेली असल्याने शेतीचेही नुकसान झालेले आहे. यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने आर्थीक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, चार दिवसांपुर्वी सलग चोवीस तास पाऊस पडला. यात बीड आणि शिरूर तालुक्यातील बहूतांश महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे. सलग झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचलेले असून काही ठिकाणी पाण्याचे उपळे लागलेले आहेत. परिणामी, पिकांना पाणी लागलेले असून काढणीला आलेल्या पिकांच्या मुळ्या सडल्या आहेत. पिके पिवळी पडली असून सोयाबीन, उदिड आणि कांद्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तर काही भागातील नद्यांना महापूर आल्याने नदी काठी असलेल्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. पिकांसह शेतीचेही नुकसान झालेले असून यासोबतच जमीनी खरडून जाताना अनेकांच्या पाईपलाईनही तुटून वाहून गेल्या आहेत. या गोष्टींचा पंचनामे करताना विचार करावा, महसूल प्रशासनाने दोन दिवसात तातडीने पंचनामे करून शासनाला कळवावे आणि विलंब न लावता शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही बबनराव गवते यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, पंचायत समिती सदस्य सचिन शेळके, केशव तांदळे, भागवत मस्के, योगेश बहिरवाळ, अप्पा इंदूरे, सचिन घरत, प्रतिक कदम यांची उपस्थिती होती.