मनमोकळ्या संवादाने पदाधिकाऱ्यांत निर्माण झाली सकारात्मक भावना!
पक्षाच्या विरोधातील फेक नेरेटिव्ह खोडून काढा, एकजूटीने काम करत विजयाचे शिल्पकार होण्याचे केले आवाहन
पुणे : भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा आ. पंकजाताई मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कालपासून सुरू केलेल्या बैठकांमधून पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी अगदी मनमोकळा संवाद साधत त्यांना बोलते केले. या संवादाने पदाधिकाऱ्यांचे मनोबल तर वाढलेच शिवाय त्यांच्यात उत्साह देखील पहायला मिळाला. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सैनिक आहे, येणाऱ्या निवडणुकीची तुम्हीच धुरा हातात घ्या,पक्षाच्या विरोधातील फेक नेरेटिव्ह खोडून काढा, एकजूटीने काम करत विजयाचे शिल्पकार व्हा असं आवाहन आ. पंकजाताईंनी केलं.
आ. पंकजाताई मुंडे यांनी आज पुण्यातील वडगाव शेरी, शिरूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, त्यावेळी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. वडगाव येथे माजी आमदार जगदीश मुळीक, शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख अर्जुन जगताप तर वाघोली येथे विधानसभा प्रमुख प्रदीप कंद, जयश्री पलांडे तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. पंकजाताई मुंडे यांनी दोन्ही बैठकांमधून मतदारसंघाचा आढावा घेतला तसेच कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत मतदारसंघात पंधरा महिला मेळावे घेणे, वयोश्री व कामगार योजना, अद्ययावत मतदार यादी, बुथस्तर कार्यकर्ता आदी विषयांवर त्यांनी बैठकीत सविस्तर चर्चा केली.
*फेक नेरेटिव्ह खोडून काढा*
——–
यावेळी बोलतांना आ. पंकजाताई म्हणाल्या, पक्षासाठी कार्यकर्ता महत्वाचा आहे. परिस्थिती कशीही असो संघटन मजबूत करून पक्षासाठी मैदानात उतरावं लागेल. राष्ट्रहितासाठी सत्ता आणणं आणि त्यातून जनतेची सेवा करणं हे लक्षात ठेवून एकजुटीने काम करा.लोकसभेला आपलं जे नुकसान झालंय ते भरुन काढायचं आहे. म्हणूनच, आपल्यासारख्या छोट्या छोट्या योद्ध्यांना पक्षाने मैदानात उतरवलं आहे. आता, पक्षासाठी आपण सर्वांनी जोमाने काम करायला हवं, सेनापती सांगत असतो पण सैनिकाला प्रत्यक्ष लढावं लागतं, तुम्ही सैनिक आहात, असे म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरुन पक्षासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी केलं.
••••