गेवराई तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पहाणी करुन नुकसानग्रस्तांना दिला दिलासा
गेवराई प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळामध्ये ६५ मी.मी. पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे सर्वत्र अतिवृष्टी होवुन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाधीत शेतकर्यांना थेट मदत करण्यात यावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असा शब्द कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिला आहे. गेवराई तालुक्यातील लोणाळा, अर्धमसला, तळेवाडी आदी ठिकाणी त्यांनी नुकसानाची पहाणी केली. यावेळी बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित त्यांच्या समवेत उपस्थित होते. भरपावसात कृषी मंत्र्यांनी शेतकर्यांच्या बांधावर जावुन नुकसानग्रस्तांना दिलासा दिला आहे.
राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातील लोणाळा, अर्धमसला, तळेवाडी सह आदी भागातील नुकसानग्रस्त शेतीची बांधावर जावुन पहाणी केली. अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या आणि कापुस पिकावरील अकस्मीक मर (पॅरा विल्ट) मुळे त्रस्त असलेल्या शेतकर्यांशी अस्थेवाईकपणे संवाद साधला. तळेवाडी येथे भरपावसात त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पहाणी केली. बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासह गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. माध्यमांशी बोतलांना कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे म्हणाले की, ज्या ठिकाणी 24 तासात अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची गरज भासत नाही, असा एसडी आर एफ चा नियम आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास सर्व महसुल मंडळात चोवीस तासात ६५ मी.मी. पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे तो भाग अतिवृष्टीखाली येतो त्यामुळे संपुर्ण बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेत जमीनीचे पंचनामे किंवा ई पिक पहाणी करण्याची गरज न भासू देता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकर्यांना सरसकट थेट शासनाकडुन मदत दिली जावी याबाबत आपण वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, खरडुन वाहुन गेलेल्या जमीनी, गाय, म्हैस या सारख्या पशुधनांचा मृत्यु झाला असल्यास अशा घटनांच्या बाबतीत पंचनाम्यांची गरज भासणार आहे. असे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिलेले आहेत. अतिवृष्टीचे मोठे संकट निर्माण झाले आहे, यातुन शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम महायुती सरकार करत आहे. थकीत पिक विम्याच्या संदर्भात त्यांनी गेवराई येथे अधिकार्यांना कृषी विभागाने सुनावणी घेवुन मान्य केलेल्या गेवराई तालुक्यातील २५२२१ शेतकर्यांना तात्काळ पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. कृषी मंत्र्यांच्या दौर्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा मिळाल्याची भावना बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केली.