पुणे: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्यपालांना काळे झेंंडे दाखवत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. पोलिसांनी स्वराज्य संस्था, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगातील आदर्श आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ते आज पुणे दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी गोंधळाचं वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. राजभवन परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली आहे.
राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप तसेच कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र होतं. पुणे शहर राष्ट्रवादी यांच्याकडून राज्यपालांना राजभवनावर काळे झेंडे दाखवून राज्यपाल गो बॅक अशी घोषणा देण्यात आल्या. या सगळ्या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पुणे शहर राष्ट्रवादी अध्यक्ष प्रशांत जगताप जबाबादार असतील, अशी पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती.
यशदा संस्थेमध्ये राज्यपाल काही कार्यक्रमानिमित्त आले असता स्वराज्य संस्थेच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. या परिसरात अनुचित घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे यशदा ते राजभवन परिसरात छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे.