फर्निचर खरेदीच्या चौकशीची मागणी
गेवराई । गेवराई पंचायत समितीच्या प्रशासकावर कोणाचे नियंत्रण सध्या राहिले नसल्याने मोठा सावळा गोंधळ सुरू आहे.पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत पंचायत समिती स्तरावर अवाजवी,निकृष्ट दर्जाचे फर्निचर व इतर साहित्य खरेदी करून जवळपास सतावीस लाख रुपयांचा घोटाळा केल्याचे समजते.या खरेदीची चौकशी करून प्रशासकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
गेवराई पंचायत समितीच्या सभापती व सदस्याचा कार्यकाळ संपल्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून गेवराई पंचायत समितीचा कारभार प्रभारी गटविकास यांच्याकडे आहे.काही दिवसापूर्वी श्रीमती कांबळे यांनी पदभार घेतला आहे.पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासकाच्या हातीच पंचायत समितीचे पूर्ण सूत्र आहे. गेल्या सहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये गेवराई पंचायत समितीमध्ये मोठा सावळा गोंधळ उडाला आहे.कोणाचेच कुणावर नियंत्रण नसल्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची चर्चा गेवराई पंचायत समिती परिसरात आहे.गेवराई पंचायत समितीसाठी तत्कालीन ग्रामविकास मंञी पंकजाताई मुंढे व आमदार लक्ष्मण पवार यांच्या प्रयत्नातून भव्य इमारत साकारली.या नुतन वास्तूमध्ये टेबल,खुर्च्या,कपाट, इतर फर्निचर साहित्य व सीसीटीव्ही कॅमेरे यासाठी गेवराई पंचायत समितीच्या प्रशासकाने जवळपास २७ लाख रुपयाचा पंधराव्या वित्त आयोगातून पंचायत समिती स्तरावर निधी उपलब्ध केला.यासाठी निविदा मागविण्यात आल्या,मात्र निकृष्ट दर्जाचे फर्निचर व सीसीटीव्ही कॅमेरे बसून या प्रशासकाने लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे समजते.बाजारात उपलब्ध असलेल्या फर्निचरच्या किंमती पेक्षा जास्त किंमती देऊन निकृष्ट दर्जाचे फर्निचर व सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी केले आहेत.गेवराई पंचायत समिती मध्ये कर्मचारी व जनता यांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी फर्निचर व सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी केले की घोटाळा करण्याचा हेतू होता असा प्रश्न उपस्थित सध्या होत आहे.या बाबीची चौकशी होणे आवश्यक आहे. बाजारामध्ये कमी किंमतीने व दर्जेदार साहित्य उपलब्ध होत असताना आवाजवी दराने साहित्य खरेदी करून प्रशासनाला काय साध्य करायचे होते असा प्रश्न उपस्थित होत आहे.या सर्व प्रकारची बीडच्या वरिष्ठांनी नि:पक्षपाती चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.