परळी (प्रतिनिधी) – माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे हे आज भर पावसात वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते दर्शन झाल्यानंतर मंदिरासमोरील चहाच्या टपरीवर गप्पा मारत त्यांनी उभ्याने चहा घेतला आणि गप्पा चांगल्याच रंगल्या…!
धनंजय मुंडे हे आपल्या वक्तृत्व शैलीबरोबरच साधेपणासाठी देखील नेहमी चर्चेत असतात.
मंत्री असोत किंवा नसोत मात्र कायम माणसात राहणाऱ्या मुंडेंना अखंड हरिनाम सप्ताहाच्या, लग्नाच्या आदी पंगती मध्ये बसून अनेकवेळा त्यांना जेवताना कित्येकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर मोटरसायकल वरून शहरात फेरफटका टाकणारे, गावभर कार्यकर्त्यांसह पायी फिरणारे, चहाच्या कट्ट्यावर चहा पिताना, समोसा-पान खाताना देखील धनंजय मुंडे यांना अनेकांनी याआधीही पाहिलेले आहे.
आज परळी शहरात दिवसभर हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होता, त्यादरम्यान धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही भागामध्ये आणखी समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावू शकते, तर आगामी काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर असलेले दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी प्रभू वैद्यनाथांकडे प्रार्थना केल्याचे धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
दरम्यान मंदिरात दर्शन झाल्यानंतर मंदिरासमोरील प्रसिद्ध शिरीष स्वामी यांच्या चहाच्या कट्ट्यावर धनंजय मुंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चहा घेतला. हॉटेल चालक शिरीष स्वामी यांच्यासोबत त्यांनी फोटो देखील काढला. यावेळी गडचिरोली, हिंगोली आदी जिल्ह्यातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी धनंजय मुंडे यांनी संवाद साधत त्यांचीही विचारपूस केली. यावेळी युवा नेते अजय मुंडे, सूर्यभान नाना मुंडे, सुंदर गित्ते, डॉ. संतोष मुंडे यांसह हॉटेल चालक शिरीष स्वामी आदी उपस्थित होते.