बीड, गेवराई, माजलगाव, परळी, धारुर, अंबाजोगाई यासहा नगर पालिकेंचा समावेश
प्रतिक्षा संपली, प्रभागरचना जाहिर होणार, सहाही पालिकांतील भावी उमेदवार खूष
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : मुदत संपल्यानंतरही तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील सहा नगर पालिकेच्या निवडणूका ऐन उन्हाळ्यात होणार आहेत. यात राज्यातील 100 पेक्षा जास्त नगर पालिकेंचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने 2022 पर्यंत ज्या नगर पालिकेच्या मुदत संपल्या आहेत त्यांच्या प्रभाग रचनेची अंतिम यादी 10 मार्च 2022 पासून करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, परळी, धारुर, अंबाजोगाई या सहा नगर पालिकेच्या निवडणूका ऐन उन्हाळ्यात होणार असून भावी उमेदवार मात्र खूष झाले आहेत. भावी उमेदवारांनी आप-आपल्या परिने मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. नगर पालिका आपल्या ताब्यात कशी राहील, यासाठी मात्र जिल्ह्यातील प्रस्थापित मंडळी तयारी लागली आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात म्हणटले आहे की, प्रभाग रचनेचा कार्याक्रम 10 मार्च ते एक एप्रिल पर्यंत संबंधित जिल्हाधिकारी यांनी पुर्ण करावा, त्यानंतर एक एप्रिलला निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचना जाहीर करावी असे आदेश निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. एप्रिल मध्ये प्रभाग रचना पुर्ण झाल्यानंतर राज्यातील व जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नगर पालिकेंच्या निवडणूका होणार आहेत. यात बीड जिल्ह्यातील सहा नगर पालिकेंचा समावेश आहे. या निवडणूका मे मध्ये होणार असल्यामुळे आता पासूनच भावी उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. तसेच ज्यांच्याकडे नगरपालिकांची सत्ता होती ती सत्ता परत आपल्याकडेच कशी राहील यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे इतर नेते ताब्यात नसलेल्या नगर पालिका आपल्या ताब्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. ऐन उन्हाळ्यात निवडणूका होणार असल्यामुळे या निवडणूकीत कोणाची सत्ता येणार याकडे मात्र आता पासूनच सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भावी उमेदवार लागले तयारीला…!
येणाऱ्या नगर पालिका निवडणूकांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील भावी उमेदवार तयारी लागले असून प्रभागातील मतदारांच्या भेटीगाठीवर जास्त जोर देत आहेत. समस्यांची चौकशी, लग्न सोहळे, सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थिती, संभाव्य प्रभागात येणाऱ्या मतदारांचे वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करणे यासह इतर विशेष बाबींवर भावी उमेदवार विशेष लक्ष देताना दिसत आहेत.
बीड, गेवराई व परळी नगरपालिकेवर विशेष लक्ष
बीड जिल्ह्यातील सहा नगर पालिकेच्या निवडणूका होणार असून यात बीड, गेवराई व परळी नगर पालिकेवर विशेष लक्ष असणार आहे. परळीत भाऊ-बहिण यांच्यात लढत राहील तर गेवराईत तिन्ही पंडित यांच्यात लढत पाहाव्यास मिळणार आहे. बीड मध्ये काका-पुतणे, शिवसंग्राम, एमआयएम व इतर पक्षात लढत होणार आहे. येथील नगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी येथील सर्वच नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.