दोन वर्षांपासून फक्त राजकीय श्रेयवादातून गोरगरीब, निराधारांचे 20 हजार प्रस्ताव धुळखात
गेवराई तहसीलसमोर आ.लक्ष्मण पवार यांचे आमरण उपोषण सुरू
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : गेवराई तालुक्यातील गेल्या दोन वर्षांपासून फक्त राजकीय श्रेयवादातून 20 हजार निराधारांचे प्रस्ताव धुळखात पडून आहेत. त्या अर्जांवर तात्काळ निर्णय घेण्यात यावा यासह नियमबाह्य काम करणाऱ्या तहसीलदार सचिन खाडेवर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज गेवराई मतदारसंघाचे आ.लक्ष्मण पवार यांनी गेवराई तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये येथील अनेक महिलांनी व नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.
निराधारांचे प्रश्न संवेदनशिलतेने मार्गी लावा, नियमबाह्य काम करणाऱ्या तहसीलदार यांच्यावर कारवाई करा, गेवराई तालुक्यातील दहा हजार लाभार्थ्यांना एका रात्रीत अपात्र करणाऱ्या सं.गा.यो समिती बरखास्त करा, नियमानुसार समितीच्या बैठका घेवून गेवराई तालुक्यातील जनतेला राजकीय चौकटीबाहेर जावून निराधारांचे प्रश्न निकाली काढा, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्याचे प्रकरण तातडीने निकाली काढा या मागण्यासाठी आज आ.लक्ष्मण पवार यांनी गेवराई तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, भगवानराव घुंबार्डे, पं.स.सभापती दिपक सुरवसे, उपसभापती संदीप लगड, नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ यांच्यासह इतर पदाधिकारी व महिला नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.