प्रारंभ वृत्तसेवा
कोकणासह विदर्भातही अतिवृष्टी; हवामान विभाग
बीड : पहिल्या दिवशी मुंबईत जोरदार पाऊस झाल्यानंतर आता मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस अत्यंत मुसळधार म्हणजेच 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
केरळमधून दोनच दिवसांत महाराष्ट्रात दाखल झालेला मोसमी पाऊस सहा दिवसांचा प्रवास करीत राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. गेल्या वर्षी 14 जूनला त्याने महाराष्ट्र व्यापला होता. कोकणातून तो मुंबई परिसरात दाखल होत असताना किनारपट्टीच्या भागात मोठ्या उंचीचे ढग निर्माण झाले होते. परिणामी, या भागांत अतिवृष्टीची नोंद झाली. मुंबईच्या सांताक्रुझ केंद्रावर आणि ठाण्यात चोवीस तासांत प्रत्येकी तब्बल 230 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या भागांत पावसाने दाणादाण उडवून देत जनजीवन विस्कळीत केले. गुरुवारीही याच भागात जोरदार पावसाची हजेरी होती. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, महाबळेश्वर, विदर्भातील अमरावती, अकोला, चंद्रपूर, गोंदिया आदी भागांतही गुरुवारी पाऊस झाला.
मराठवाड्यात सुद्धा मुसळधार
हे.कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी भागांत काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वाराही वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, केोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, तर घाट क्षेत्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे.मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली.