स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीला फाशीच*स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीला फाशीच व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम भूमिका – धनंजय मुंडे
हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जावे, कुणीही कुणाच्याही जवळचे असले तरी त्याची गय न करता कठोर शासन व्हावे – माझी सुरुवातीपासूनच मागणी
मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोग
येथील तरुण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कडक शासन व्हावे, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी पहिल्या दिवशीपासून ठाम भूमिका होती आणि आजही तीच कायम आहे. या प्रकरणी आरोपींना कोणाच्याही कितीही जवळचा असला तरी तातडीने शासन व्हावे यासाठी आणि न्यायालयीन दिरंगाई होऊ नये म्हणून फास्टट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालावे यासाठी बारा डिसेंबरला सर्वात आधी मुख्यमंत्र्यांकडे लेखी मागणी मी केलेली आहे, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही सर्वांचीच भूमिका आहे. मात्र या घटनेच्या आडून जे राजकारण केले जात आहे, ते दुर्दैवी आहे, तसे हे राजकारण करू नये असे कळकळीचे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.
स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येची घडलेली घटना निर्घृण आणि तितकीच चीड आणणारी होती. यासारख्या घटना जिल्ह्यातच काय तर महाराष्ट्रात कुठेही होऊ नयेत यासाठी अशा गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढणे आवश्यक आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी योग्य ती पाऊले उचलली असल्याचे ते म्हणाले.