ताई तुम्हीच असे केले तर तुम्हाला मतदान कसे द्यायचे
पोलीस प्रशासन म्हणते आम्ही आरोपींच्या शोधाताई टिम पाठवल्या तर मग खांडे खुलेआम कसे फिरतात
पोलीस अधीक्षक साहेब सर्वसामान्य कुटुंबातील आरोपी असता तर तुम्ही रात्रीच उचलला असता मग सत्ताधाऱ्यांना का उचलायचे धाडस करत नाहीत
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : पंकजाताई यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन सर्वसामान्य वर्गाचा चांगला आहे. अधिकारी वर्गात सुद्धा पंकजा मुंडे यांची प्रतिमा चांगली आहे परंतु आज पंकजा मुंडे यांनी रामनवमीनिमित्त रामगडावर ज्यावेळेस भेट दिली त्यावेळेस त्यांच्यासोबत 307 गुन्ह्यातील आरोपी कुंडलिक खांडे हे फिरत होते. यामुळे जर ताई आपणच 307 मधील आरोपीला सोबत घेवून फिरत असताल तर सर्वसामान्यांनी तुम्हाला कसे मतदान करायचे? असा प्रश्न आता सर्वसामान्यांमधून भाजपच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांना विचारला जात आहे. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन म्हणतेय 307 मधील आरोपीच्या शोधासाठी आम्ही टिम पाठवली आहे. तर मग शिवसेना शिंदेगटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना मारहाण झालेल्या प्रकरणात 307 कलम प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून यात मुख्य आरोपी म्हणून जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव आहे. तर मग कुंडलिक खांडे खुलेआम फिरत असूनसुद्धा पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका का घेते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील एखादा आरोपी असता तर त्याला त्याच दिवशी पोलीसांनी ताब्यात घेतले असते परंतु अकरा दिवस उलटूनही पोलीस प्रशासन खांडेंना का ताब्यात घेत नाही? पोलीस प्रशासन खांडेंना घाबरते का? पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांना एक न्याय व सामान्यांना एक न्याय देते काय? यासह इतर प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर ज्ञानेश्वर खांडे यांच्या जबाबावरून शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाप्रमुखसह अकरा जणांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गेल्या 11 दिवसांपूर्वी 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु अद्यापही यातील आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले नाही. या सर्व बाबींवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कारभारावर संशय निर्माण होत आहे. आज तर याप्रकरणी मुख्य आरोपी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे भाजपाच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासोबत फिरताना दिसले. यामुळे पंकजा मुंडे आपणच जर 307 गुन्हा नोंद असलेल्या आरोपीला सोबत घेवून फिरत असताल तर तुम्हाला मतदान तरी करायचे कसे? असा प्रश्न सुद्धा सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. बीड ग्रामीण पोलीस म्हणतात की या प्रकरणात आरोपीच्या शोधासाठी आम्ही पथक पाठवले आहे तर मग खांडे ऑनरेकॉर्ड फिरत असतानासुद्धा त्या पथकाला खांडे का सापडत नाहीत? ते पथक फक्त कागदावरच आहे का? का पोलीसांचे खांडेंना अटक करण्याचे धाडस होत नाही? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.