युवराज सिंग आणि जहीर खान येणार परळीत!
03 मार्चला होणार भव्य फायनल व बक्षीस वितरण
परळी वै. – राज्याचे कृषिमंत्री, परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, तसेच युवकांचे नेते धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून, नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मा.गटनेते अजय मुंडे यांनी परळी वैद्यनाथ येथे आयोजित केलेल्या डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा येत्या 3 मार्च रोजी फायनल होणार असून या फायनल सामन्यासाठी व बक्षीस वितरणासाठी भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज फलंदाज, प्रसिद्ध क्रिकेटर युवराज सिंग तसेच भारतीय क्रिकेट संघाची स्पीड मशीन म्हणून ओळख असलेला क्रिकेटपटू जहीर खान हे दोघेही परळी वैद्यनाथ येथे उपस्थित राहणार आहेत.
मागील सुमारे एक महिन्यापासून परळी शहरात नाथ प्रतिष्ठान आयोजित डे-नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या क्रिकेट स्पर्धेमध्ये परळी शहरासह परळी विधानसभा मतदारसंघातून 260 पेक्षा अधिक संघांनी भाग घेतला होता. त्याचबरोबर डीएम 11 या क्रिकेट संघाच्या माध्यमातून स्वतः धनंजय मुंडे यांनी देखील यास क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होऊन क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला होता.
दरम्यान ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून या स्पर्धेचा फायनल येत्या 3 मार्च रोजी वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानावर खेळवला जाणार असून त्यानंतर त्याच ठिकाणी ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या फायनल सामन्यासह बक्षीस वितरणाच्या समारंभास भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज म्हणून ओळख असलेला युवराज सिंग तसेच बॉलिंग ची स्पीड मशीन म्हणून प्रसिद्धीस असलेला जहीर खान हे दोन खेळाडू यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
दरम्यान या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार पाहण्यासाठी तसेच खेळाडूंच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत असलेल्या बक्षीस वितरण समारंभात उपस्थित राहून आपल्या लाडक्या खेळाडूंना भेटण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवकांचे नेते अजय मुंडे यांनी केले आहे.