महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गेवराईत विविध उपक्रम राबविणार-अमरसिंह पंडित
बीड प्रतिनिधी : महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्याकडून विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यांच्या कार्यक्रमातून प्रेरणा घेत गेवराई मतदारसंघात सुद्धा महिलांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी सांगितले.
महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि कल्पतरू च्या माध्यमातून घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली होती. शहरातील सिंहगड लॉन्स, कॅनॉल रोड येथे शनिवारी (दि.७) स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या स्पर्धेतील महिला विजेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण आणि कल्पतरूच्या सचिव डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत सुनीता गोरे (प्रथम), स्वाती सोहनी, स्मिता काकडे (द्वितीय), पूजा धोत्रे, पूजा गवळी यांनी (तिसरा) क्रमांक पटकावला. तसेच मयुरी कुलकर्णी, शैला टाकळकर, सविता जाधव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विजेत्यांना रोख रक्कम, साडी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की, डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी महिलांसाठी बीडमध्ये सुरू केलेल्या या स्पर्धेतून प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन गेवराई तालुक्यात देखील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करणार आहे. घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा अखंडपणे सुरू ठेवा. यामुळे महिलांमध्ये संवाद साधला जाईल. महिलांमधील संवाद चालू राहणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवावी, जेणेकरून जास्तीत जास्त महिला सहभाग घेतील असे आवाहन केले.
यावेळी कल्पतरूच्या सचिव डॉ. सारिकाताई क्षीरसागर म्हणल्या की, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने कल्पतरूच्या माध्यमातून अध्यक्षा डॉ.दीपाताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा, कार्यक्रम आयोजित केले जातात. महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न असतो. गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कल्पतरूच्या माध्यमातून घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी जास्त प्रतिसाद मिळाला. यावेळी
७५ वर महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. यावेळी प्रत्येक स्पर्धकांच्या घरी जाऊन या सजावटीची पाहणी केली. यावेळी महिलांनी केवळ गौरी गणपतीची सजावट न करता सजावटीतून वेगळेपण दाखवून दिले. आम्हाला विजेत्या निवडताना खूप विचार करावा लागला. कारण सर्वच महिला स्पर्धकांनी गौरी गणपतीची सजावट अत्यंत सुंदररित्या केली होती. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढच्या वर्षी ही स्पर्धा भव्य स्वरूपात घेऊ. या बक्षीस वितरण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे, बळीराम गवते, महादेव आण्णा धांडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा खोसरे, धोंडराईच्या सरपंच शीतलताई साखरे, राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष शालिनी परदेशी, जिल्हा सचिव पुनम वाघमारे, युवती जिल्हाध्यक्ष प्रिया डोईफोडे, शीतल धोंडरे, संगीताताई वाघमारे, कोमल राजपूत, ललिता तांबारे, कल्पना बांगर, शीतल मस्के, सुजाता कांबळे, योजना स्वामी, संगीताताई गायसमुद्रे, उषा शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या, महिला स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.