एकाच पावतीवर 8 ते 10 ट्रीप होतात कोणाच्या आशीर्वादाने?
बोगस ईटीपी पावत्या बनवून वाळू माफियांची माफियागिरी!
जिल्हाधिकारी मॅडम ईटीपी बोगस पावत्या कोणाच्या आशीर्वादाने बनवू लागल्या?
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : राज्य शासनाने सर्वसामान्यांना अल्पदरात वाळू मिळावी यासाठी राज्यामध्ये 600 रुपये ब्रासमध्ये वाळू उपलब्ध व्हावी यासाठी राज्यभरातील सर्वच जिल्ह्यात विशेष सवलतीत डेपो सुरू केले आहेत. यामध्ये 15 सप्टेंबरपासून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन याठिकाणी एक डेपो सुरू करण्यात आलेला आहे, परंतु याचा सर्वसामान्यांना कमी फायदा व वाळूमाफीयांना व संबंधित अधिकाऱ्यांना जास्त फायदा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे बोगस ईटीपी पावत्या बनवून अनेक वाळूमाफीया दिवसरात्र वाळूची वाहातुक करत असून या माफियागिरीला जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकारी मॅडम आपण ईटीपी पावत्या बोगस बनवणाऱ्यांना चाप लावणार कधी? सर्वसामान्यांना 600 रुपये ब्रासने वाळू मिळणार कधी? सध्या सुरू असलेली वाहातुक संबंधित अधिकाऱ्यांच्या फायद्याची असून यात सर्वसामान्यांना याचा अल्प फायदा होत आहे. यामुळे मुख्यमंत्री साहेब बीड जिल्ह्यात सुरू असलेली वाळूमाफियागिरी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लागत आहे. तरी आपण या गंभीर प्रकाराकडे विशेष लक्ष देवून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना प्रति व्यक्ती पाच ब्रास वाळू तीही फक्त तीन हजार रुपये प्लस वाहातूकीचा खर्च अशा अल्पदरात उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात ही विशेष सवलत सुरू केली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात ही सवलत 15 सप्टेंबरपासून सुरू झाली असून यामध्ये सुद्धा वाळूमाफियांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी मनमानी सुरू केली आहे. बोगस ईटीपी पावत्या फाडून दिवसरात्र वाळूची वाहातूक होत आहे. यात विशेष म्हणजे एकाच पावतीवर 8 ते 10 ट्रिप होत आहे. या सर्व बाबींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना असताना सुद्धा संबंधित अधिकारी या गंभीर प्रकाराकडे का दुर्लक्ष का करत आहेत? असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी मॅडम आपण जिल्ह्याचा चार्ज घेतल्यानंतर मध्यंतरी मध्यरात्री एका हायवाचा पाठलाग केला, या दरम्यान तुमच्या वाहनालाही कट मारण्यात आला, यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण एक डॅशिंग अधिकारी म्हणून सर्वत्र चर्चा झाली परंतु हा पाठलाग खरंच कारवाईसाठी होता की इतर हेतूने होता? कारण सध्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेली वाळूची अवैध वाहातूक तुम्हाला सुद्धा दिसत आहे परंतु याप्रकरणाकडे आपण सर्रास डोळेझाक करत आहात, यामुळे 600 रुपये ब्रास वाळूचा सर्वसामान्यांना कमी फायदा व वाळूमाफियांना व संबंधित अधिकाऱ्यांना जास्त फायदा होत आहे.
तीनदा इनव्हॅलेड झालेली वाहने रस्त्यार चालतात तरी कशी?
सध्या सहाशे रुपये ब्रास वाळूच्या नावाखाली हायवा जिल्ह्यात सुसाट सुरू आहेत. यावर वॉच ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी या वाहनांची चेकींगसुद्धा करत आहेत, चेकींगदरम्यान बोगस पावत्या असणाऱ्या वाहनांवर कारवाया करण्यात येत आहेत. तीन-तीन वेळेस इनव्हॅलेडच्या कारवाया झाल्या असल्या तर ही वाहने रस्त्यावर चालतातच कशी? या वाहनधारकांवर जिल्हाधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे का? या वाहनांवर कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
ईटीपी बोगस पावत्यांचा जिल्ह्यात सुळसुळाट
सध्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन याठिकाणी 600 रुपये ब्रास वाळूचा डेपो सुरू करण्यात आला असून ही वाळू जे ग्राहक ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करतील त्याच सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे परंतु बोगस ईटीपी काढून सध्या ही वाळू लुटण्याचा प्रकार अनेकांकडून सुरू आहे. यामुळे ज्या बोगस ईटीपी पावत्या बनवल्या जात आहेत त्या कोण बनवत आहे व त्या पावत्या कोणाच्या अशीर्वादाने बनत आहेत यावर मुख्यमंत्री साहेब आपण सखोल अभ्यास करून या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.