गेवराई प्रतिनिधी : राज्यातले सत्ताधारी मंत्री आणि आमदार खुर्ची टिकविण्यात आणि एकमेकांवर आरोप करून कोट्यावधीचा निधी मिळविण्यात मशगुल आहेत. दहीहंडीच्या कार्यक्रमाला कोट्यावधी रुपयांचा खर्च करून त्यात चित्रपटातील नट-नटी आणून आपण किती मोठे समाजकार्य करतो हे दाखवत आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही अशा परिस्थितीत गेवराई विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन जनावरांच्या छावण्या सुरू करा यासह विविध मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेवराई तहसीलवर हजारो शेतकऱ्यांचा जनआक्रोशी मोर्चा धडकला. यामुळे प्रशासन चांगलेच हादरले आहेत.
गेवराई विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11वाजता माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचायत समिती कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौक, दाभाडे गल्ली ते तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला. दरम्यान या मोर्चात आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बदामराव पंडित यांनी जाहीर पाठिंबा दिला. गेवराई विधानसभा मतदारसंघात पाऊस न झाल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे तात्काळ गेवराई मतदारसंघ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ करून किमान 12 तास सुरळीत विद्युत पुरवठा करावा. पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव द्यावा, गेवराई शहरासह तालुक्यातील अतिक्रमण धारकांना पीटीआर द्यावा, संजय गांधी श्रावण बाळ या योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ पेमेंट टाकावे, यासोबतच पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व गायरान धारकांना आर्थिक मदत द्यावी आदी मागण्या घेऊन हा विराट मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते. दरम्यान या सर्व मागण्यांचे निवेदन तहसीलदार विश्वास खोमणे यांना देण्यात आले.
या मोर्चाला बदामराव पंडित यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, युवानेते युध्दाजित पंडित, रोहित पंडित, अभिराजे पंडित, नितीन धांडे, किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते, तालुकाप्रमुख कालिदास नवले, पंढरीनाथ लगड, युवराज डोंगरे, बाबुराव जाधव, शामराव राठोड महादेव औटी, भीष्माचार्य दाभाडे, बबलू खराडे, गोविंद दाभाडे, मुकुंद बाबर, अमोल करांडे, धर्मराज आहेर, किरण आहेर, सय्यद सिराज, शेख शाहेदाद, सतीश सपकाळ, महादेव खेत्रे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. सभेचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रवक्ते दिनकर शिंदे यांनी केले.
या मोर्चाला बदामराव पंडित, अनिल जगताप, अभयसिंह पंडित, कालिदास नवले, सिद्धेश्वरी कोकाटे, अशोक नाईकवाडे, सय्यद सिराज, नारायण गाडे आदींनी संबोधित करत सरकारच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला.
बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या विराट शेतकरी जनआक्रोश मोर्चामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, शेतकरीपुत्र, शिवसैनिक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.
कोणत्याही अडचणीत मदतीची हाक द्या मी तुमच्यासाठी सदैव तत्पर — बदामराव पंडित
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे मात्र स्थानिक सत्ताधारी नेत्यांना आणि सरकार याचे काहीच घेणेदेणे नाही. या सरकारमध्ये सामील झाले सर्व गट, मंत्री हे प्रत्येकजण आपली खुर्ची राखण्यासाठी झटत आहेत. मात्र ज्या मतदारांनी यांना निवडून दिले त्यांच्या प्रश्नासाठी भांडायला त्यांना वेळ नाही. मात्र मी आज या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो, तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करा, नसता येणाऱ्या निवडणुकीत राज्यातील जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. सत्तेत असो किंवा नसो मी कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत राहील. म्हणून तालुक्यातील जनतेने मला तुमच्या कोणत्याही अडचणीच्या वेळी आवाज द्या मी तुमच्यासाठी कायम तत्पर राहील असे बदामराव पंडित यांनी या मोर्चाला संबोधित करताना सांगितले.
*———2) चौकट ——–*
*शेतकऱ्यांसाठी लढणारा बदामराव पंडित हे एकमेव नेते– अनिल जगताप*
————–
एकीकडे राज्यभरात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना तिकडे सत्तेसाठी रात्रंदिवस वाटाघाटी करणाऱ्या या तिरडी सरकारला शेतकऱ्यांच घेणं देणं नाही. आज शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभा राहीले असताना हे दहीहंडी सारख्या मोहोत्सवात नाचगाने बघत फिरत आहेत. परंतु लोकनेते बदामराव पंडित हे एकमेव नेते आहेत ज्यांनी शेतकऱ्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम करत आहेत. तुम्ही कधीही हाक द्या, आबा कायम तुमच्यासाठी कायम तत्पर असतील म्हणून येणाऱ्या निवडणुकीत तालुक्यातील सर्व सामान्य जनतेने बदामराव पंडित यांच्या पाठीशी उभे राहावे. बदामराव पंडित हे भावी मंत्री असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.