बीड शहर पोलीस ठाण्यात लग्नाळूंना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
दोन मुलींना बीड शहर पोलीसांनी घेतले ताब्यात, मोठे रॅकेट असण्याची शक्यता
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : मुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे ग्रामीण भागात अनेक मुलांचे लग्न खोळंबले आहेत. यामुळे मिळेल ती मुलगी करून अनेकजण मुलांचे लग्न करत आहेत. याचाच फायदा आता अनेक टोळ्या घेत असून लग्नाळू मुलांची फसवणूक करताना दिसत आहेत. असाच प्रकार बीड शहर पोलीस ठाण्यात उघडकीस आला असून लग्नाळू मुलाच्या आईने नवरीसाठी चक्क अडीच लाख रुपये देवून नवरी घरात आणली होती परंतु त्याच दिवशी नवरीने घरी आल्यावर तिचा रंग दाखवण्यास सुरुवात केल्यानंतर फसवणूक झाल्याचा प्रकार नवरदेवाच्या घरच्यांच्या लक्षात आला.
फिर्यादी पोपट नवनाथ तळेकर (वय 32) रा.घाटपिंपरी ता.आष्टी जि.बीड, ह.मु.बीड शहर (कबाडगल्ली) यांच्या फिर्यादीवरून आरोपी नाना पाटील नूर सारे, विनोद खिल्लारे, बालाजी भालेकर मुलगी, दुर्गाची आई, मनकरणा माने, भाऊ आकाश माने, दुर्गा बालाजी माने, मिना बळीराम बागल सर्व रा.सिद्धार्थ नगर औंढा नागनाथ जि.हिंगोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन मुलींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मुलगी मिळत नसल्यामुळे फिर्यादीच्या लग्नासाठी खासगी एजंटने वरील फसवणूक करणाऱ्या बनावट कुटुंबाचे स्थळ आणले होते. या जाळ्यामध्ये तळेकर परिवार अडकला, लग्नासाठी नवरीला अडीच लाख रुपये देण्याचे ठरले आणि एकदाचे लग्न झाले. नवरीला घरी आणल्यानंतर नवरीची चलबिचल लक्षात आल्यानंतर तळेकर कुटुंबाची कुठेतरी फसवणूक झाल्याचा संशय आला यामुळे तळेकर यांनी शहर पोलीस ठाणे गाठून सर्व हकीकत पोलीसांना सांगितली. यानंतर पोलीसी खाकी दाखविल्यानंतर सर्व बनावट असल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्ये मोठे रॅकेट असल्याचा संशय असून त्याअनुषंगाने शहर पोलीस ठाण्याचे पो.नि.रवि सानप व त्यांची टिम तपास करत आहे.