प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : पोलीस अधिकारी कठोर असतात हे अनेक वेळा आपण पाहिले आहे परंतु त्याच वर्दीतील अधिकारी सर्वसामान्यांची जाण असणारा असतो हे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या कार्यातून दिसून येते. गुरुवारी रक्षाबंधनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात काही शाळकरी मुली पोलीस अधीक्षक यांना राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. यातील एका नववीतील मुलीने पोलीस अधीक्षक यांना आयपीएस होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर लगेचच तिला पोलीस अधीक्षक यांनी स्वत:च्या खुर्चीवर बसवत तिची इच्छा पूर्ण केली. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसल्याचे समाधान पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी व्यक्त केले. यासह मुलींना त्यांनी खुप शिका, मोठे व्हा अशा शुभेच्छा यावेळी दिल्या.
शहरातील राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयातील नववीत शिकणारी सृष्टी दिलीप प्रभाळे हिच्यासह अनेक विद्यार्थीनी गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक यांना राखी बांधण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी सर्वच मुलींशी सविस्तर चर्चा करत भविष्यामध्ये तुम्हाला काय बनायचंय याची विचारपूस केली, यावेळी सृष्टीने सांगितले की मला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. यानंतर लगेच पोलीस अधीक्षक यांनी स्वत:च्या खुर्चीवर बसवले. यानंतर तिला विचारले की, तुला आता कसे वाटत आहे, यावेळी सृष्टीने सांगितले की, मला थोडे दडपण आल्यासारखे होत आहे. यानंतर पोलीस अधीक्षक यांनी सृष्टीला सांगितले की दूरवरून ही खुर्ची चांगली दिसत असली तरी ही खुर्ची खुप जबाबदारीची असल्याची जाणीव सृष्टीला करून दिली. यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी सर्वच मुलींना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.