–जिल्हा रुग्णालयाचा कायापालट करणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळेंना पदावरुन हटवले
–प्रभारी बीड जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. सुरेश साबळे यांचे काम मोलाचे
–बीडचे नवे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून सतिष दयाराम सुर्यवंशी यांची नियुक्ती
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. सुरेश साबळे यांनी जिल्ह्यात चांगले काम केले, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून डॉ. साबळे यांनी विशेष पुढाकार घेतला होता. जिल्हा रुग्णालयातच गर्भवती महिलांची नॉर्मल डिलीवरीसाठी त्यांनी जिल्हा रुग्णालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. यामुळे अनेकांचा लाखो रुपयांचा खर्च वाचला. यासह जिल्हा रुग्णालयात स्वच्छेतेसाठी त्यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे खासगी रुग्णालयापेक्षा जिल्हा रुग्णालयात स्वच्छता जास्त दिसत होती. एवढे चांगले काम करत असून सुद्धा डॉ. साबळे यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याला आणले आहे. नेत्यांनो थोड्या तरी लाजा ठेवा व जिल्ह्यात चांगले काम करणारे अधिकारी राहू द्या अशी मागणी होत आहे. सध्या जिल्ह्यात अनेक भागात सुस्त अधिकाऱ्यांचा ढिग साचला आहे. यामुळे जिल्ह्यात चांगल्या अधिकाऱ्यांना काम करुन द्या नसता जिल्ह्याची वाट लागेल असा सुद्धा दबक्या आवाजात सुर निघत आहे.
बीड जिल्ह्यात एक तर चांगले अधिकारी येत नाहीत. एखादा चांगला अधिकारी जिल्ह्यात चांगले काम करत असेल तर त्या अधिकाऱ्याला काम करु दिले जात नाही हा बीड जिल्ह्याचा इतिहास आहे. प्रभारी बीड जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. सुरेश साबळे हे गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात चांगले काम करत होते, त्याच्या विरोधात साधी एकही तक्रार नसताना त्यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. यामुळे ज्यांनी डॉ. साबळेंच्या जागी दुसरा अधिकारी आणला आहे, त्यांच्या विरोधात नाराजगीचा सुर निघत आहे. जिल्हा रुग्णालय म्हणजे सर्व सामान्यांसाठी अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी जिल्हा रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी असणारा अधिकारी हा सर्व सामान्यांच्या परस्थितीची जाण असलेला अधिकारी याठिकाणी हवा व त्याची जाणिव डॉ. सुरेश साबळे यांना होती. ते अचानक कोणत्याही ठिकाणी भेटी देत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कारभार बऱ्यापैकी सुधारला होता. परंतु अचानक त्यांना या पदावरुन हटवण्यात आले आहे. गेल्या वर्षाभरापासून त्यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सकाचा पदभार प्रभारी म्हणून देण्यात आला होता. या दरम्यान त्यांनी जिल्हा रुग्णालयात मोठे बदल करुन सर्व सामान्यांना आधार देण्याचे काम केले होते.
बदल्याच करायच्या असतील तर भ्रष्ट अधिकाऱ्यांचा जिल्ह्यात ढिग
बीड जिल्ह्यातील अनेक विभागात अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचा ढिग पडला आहे. जर तुम्हाला बदल्याच करायच्या असतील तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या करा परंतु जे अधिकारी बीड जिल्ह्यात चांगले काम करत आहेत त्यांच्या विनाकारण बदल्या का करतात असा सवाल सध्या बीड जिल्ह्यात उपस्थित होत आहे. यामुळे बीड जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. सुरेश साबळे यांना कायम करा अशी सुद्धा मागणी होत आहे.