प्रारंभ वृत्तसेवा
मुबंई : राज्याच्या राजधानीत गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले आहेत. यामुळे वाहनधारकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली असून ते म्हणाले की, येणाऱ्या दोन वर्षात मुंबई खड्डेमक्त करणार. मुंबईतील सर्व रस्ते येत्या दोन वर्षात सिमेंटचे करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईच्या आजूबाजूच्या भागात रस्त्यातल्या खड्ड्यांची स्थिती बिकट आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या रस्त्यांच्या स्थितीमुळे मोठी टीकाही झाली होती.
सध्या 236 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. तर 400 किलोमीटरची कामे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले. 2023-24 मध्ये आणखी 423 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण काम हाती घेणार आहोत. मुंबईतील नवीन सिमेंट रस्त्यांवर पाण्याचा निचरा होण्यासाठी ठराविक अंतरावर असतील शोषखड्डेही असतील, असे त्यांनी सांगितलं. मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारणा यांचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. यापुढे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करताना ठराविक अंतरावर पाण्याचा निचरा करणारे शोषखड्डे देखील तयार केले जाणार आहेत, जेणेकरून पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवणार नाही. सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांच्या नवीन निविदांमध्ये त्यादृष्टीने अटींचा समावेश देखील करण्यात आला आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.